आहे हे असं आहे…पुस्तकांपासून आपण दूर दूर जात आहोत ही जाणीव आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रवासात मी घरातून दोन पुस्तके घेऊन जाते यावेळी EBC ट्रेकला बाहेर पडताना मला हवी असणारी दोन पुस्तके मिळाली नाहीत त्यामध्ये एक होते भूरा आणि दुसरे विजयाचे मानसशास्त्र म्हणजे बरोबर घेऊन जायची म्हणून बाजूला काढली पण ती नेमकी कुठे हे लक्षात आले नाही एकतर ती दापोली मध्ये राहिली किंवा साहित्यातून सिंधुदुर्गला रवाना झाली किंवा मग माहीत नाही कुठे असतील मात्र मग बाहेर पडताना ऐनवेळी माझ्या पुस्तकाच्या कपाटाजवळ खूप वेळ रेंगाळले आणि दोन पुस्तके निवडली एक आहे हे स आहे आणि दुसरे अती परिणामकारक लोकांच्या 7 सवयी खरेतर मला जायच्या चार दिवस आधी मित्राने डीप वर्क नावाचे पुस्तक गिफ्ट दिले होते आणि मी नेपाळला जायच्या आधी ते वाचून काढावे असे बजावले होते ते पुस्तक वाचताना मला आपण पुन्हा शाळेत गेलो आहे असे फिलिंग येत होते आणि त्यामुळे अर्थातच ते पुस्तक सोबत घ्यायचं मी टाळले.विमान प्रवासात स्वतःला शांत आणि सहनशील ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पुस्तक आहे या मताशी मी आलेले आहे योगायोगाने दोन्ही वेळा माझ्या पलीकडे बसलेले प्रवाशी वाचनप्रेमी निघाले आणि साहजिकच अपेक्षित शांतता देखील मिळाली.तर आहे हे माझे असे आहे पण मला आहे हे असं आहे या पुस्तकाबद्दल लिहायचं आहे.माझ्या पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगारात घेतलेल्या बहुसंख्य पुस्तकात हे गौरी देशपांडे यांचे पुस्तक मी विकत घेतले होते याचे कारण मी कधीतरी त्यांच्यावरील लेख वाचला होता आणि स्त्रीवादी विचारसरणी हा शब्द मी तेंव्हा लक्ष्यात ठेवला होता.तर नमनाला खूप जास्त म्हणजे खंडीभर तेल जाळण्याची मला असलेली सवय जाणार नाहीये subway सारख्या गेम मध्ये एक एक स्टेप पूर्ण करत पुढे पुढे जायचं असते तसे मुख्य विषयाकडे वळायला तुम्हाला असे काही वाचावे लागते त्याबद्दल तुम्हाला कसे वाटते? तर असो….आता पुस्तकाबद्दल बोलू …तर या पुस्तकाला कोणत्याही प्रकारची प्रस्तावना नाहीये लगेच एक एक कथा सामोऱ्या येतात.स्त्री केंद्रस्थानी किंवा मग कथेतील प्रत्येक नायिकेचे स्वगत या स्वरूपात या कथा आहेत.काही कथा त्यांचा आशय आणि त्यातून लेखिकेला सांगायचं काय आहे किंवा आपल्याला काय समजले याचा लेखा जोखां काढायचा किंवा सारांश सांगायचा तर आहे हे असं आहे एवढे एक वाक्य पुरेसे आहे.कित्येक कथांमध्ये स्त्री जन्मा ही तुझी कहाणी असा भास होत असला तरी ती नायिका खूप हतबल आहे ,सोशिक आहे असे होत नाही तिला जाणीव आहे की ती स्त्री आहे आणि त्यातून तिच्या आयुष्यातील पुरुषाबद्दल काही मते मांडताना ,अपेक्षा करताना किंवा त्यांच्या अपेक्षांबद्दल विचार करताना तिची स्वतःची भूमिका मांडत राहते.
  कावळ्या चिमणीची गोष्ट ही पहिलीच कथा आहे आपण मराठी व्याकरण शिकत असताना जे उपमेय, उपमान,उपमा अश्या काही गोष्टी घोकून घोकून पाठ केल्या आहेत त्या पठडतील ही कथा आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या स्त्री बद्दल ,स्वतःच्या संसाराबद्दल आणि त्या दोघांच्या नात्याबद्दल म्हणजे कथा वाचताना थोडासा डोक्याला ताण पण द्यावा लागतो.काही कथा पुरुषी मनोवृत्ती,पुरुषी वर्चस्व या गोष्टींना वैतागून आलेल्या स्वभानातून उतरल्या आहेत.मला यातील सर्वच कथा आवडल्या माझी विशेष आवडती कथा मायलेकी… मूल होत नाही म्हणून खूप विचार करून एक मुलगी दत्तक घ्यायचं ठरत आणि त्या वेळी विचार असा होतो की ती मुलगी जाणती असावी आपण तिचे आई वडील नाही आहोत हे तिला माहीत असावे आणि मग जेंव्हा ती मुलगी प्रत्यक्षात घरी येते ते मायलेकींचे अभावितपणे सूत जुळायला कलिंगड कसे कारणीभूत होते ही कथा फारच सुरेख गुंफली आहे.अजून खूप साऱ्या कथा म्हणजे प्रत्येक कथा स्त्रीत्वाचे प्रतिनिधित्व करणारी मात्र किती भिन्न विचारसरणीच्या स्त्रिया किंवा मग भिन्न परिस्थिती मधील,भिन्न स्वभावाच्या पुरुषांच्या सानिध्यात असलेल्या स्त्रिया. आई,बायको,मुलगी,मैत्रीण ,बहीण अश्या नानाविविध भूमिका वठवणाऱ्या….म्हणजे ना प्रत्येक कथेच्या शेवटी आपणच मनात म्हणत राहतो की आहे हे असं आहे….गौरी देशपांडे मराठी साहित्या मधील सिद्धहस्त लेखिका या पुस्तकातील कित्येक कथा आताच्या काळातील स्त्रियांना बंडखोरी वाटणार देखील नाहीत कारण शेवटी काळाबरोबर बंडखोरी याची व्याख्या पण किती बदलते म्हणजे आपल्या आई आजीच्या काळात नोकरी करणारी स्त्री बंडखोर,मनासारखा जोडीदार न निवडणारी स्त्री बंडखोर किंवा लग्न न करणारी स्त्री बंडखोर आपल्या वडिलांचे नवऱ्याचे  न ऐकता स्वतंत्र विचाराने वागणारी स्त्री बंडखोर …या पुस्तकातील कथा अश्या आहेत ज्या आताच्या स्त्रियांना बंडखोरी नाही वाटणार मात्र या कथा वाचताना टाईम मशीनने मागे जाऊन पुरुषप्रधान संस्कृती ज्यावेळी कळसाला पोहचली त्या काळातील स्त्री ची बंडखोरी या angal ने कथा वाचल्यास आपल्याला जरूर आताच्या काळात देखील काही संदर्भ जरूर सापडतात….

©राजश्री सुमन शिवाजीराव जाधव पाटील
३०/०४/२०२४

Leave a Comment