पोर्टर

पोर्टर

निळ्या डोळ्यांच्या मुलीकडे असणाऱ्या निळ्या डोळ्यांच्या बाहुली कडे बिटीया खूप वेळ आपल्या घाऱ्या डोळ्यांनी पाहत होती,तिचे डोळे काही समुद्रपेक्षा कमी अथांग नव्हते मात्र आता त्या डोळ्यांना निळ्या डोळ्यांच्या बाहुली ची तहान लागली होती.आपल्या दुकान वजा हॉटेल मध्ये आलेल्या त्या परदेशी मुलीकडे ती कित्येक वेळ पाहत होती,तिला तिच्या नकळत न्याहाळत होती आणि मध्येच उठून आपले बाबूजी कधी येणार या विवंचनेत दाराबाहेर जाऊन परत येत होती.आता अशीच बाहुली सेम हवी हे सांगायचं तर बाबूजीनी त्या निळ्या डोळ्यांच्या मुली कडील बाहुली पाहणे आता तिला गरजेचे वाटतं होते मात्र त्या मुलीचा pan केक खाऊन झाल्यावर ती मुलगी आपल्या वडिलांबरोबर तिथून निघून जाते.
मग बिटीया हिरमुसली होऊन आईकडे जाते आणि त्या निळ्या डोळ्यांच्या बाहुली चे वर्णन करून तिला तसलीच बाहुली हवी असल्याचे सांगते तिची आई स्वयंपाकघरात कामात गुंग असते आणि तिचे बोलणे ती लक्षपूर्वक ऐकत नाहीये हे बिटीया च्या लक्षात येते आणि पुन्हा ती बाबूजी आले का बघायला दरवाजापाशी निघून जाते.
इकडे तिकडे करत दिवस मावळतो,सूर्य ढगांशी रंगपंचमी खेळत आता गुडूप व्हायच्या मार्गावर येतो बिटीयाची आई बिटीयाला डाळ भात भरवत राहते आणि बिटीया पेंगुळलेल्या डोळ्यांनी दरवाजाकडे बघत जेवत राहते,उठता उठता तिची आई सांगते आज नहीं आयेंगे बाबूजी आज तो वो जादा उपर सामान लेके जायेंगें और कल या परसो वापस आयेंगे असे म्हणत बिटीयाला झोपवांयला घेऊन जाते , बिटीया झोपेत स्वप्न देखील त्या निळ्या डोळ्यांच्या बाहुलीचे पाहत राहते.दुसऱ्या दिवशी शाळेत स्नेहसंमेलन असते खूप मुली मस्त नटून थटून आलेल्या असतात शिवाय रिकाम्या वेळेत त्या एकमेकींना आपल्याकडे असणाऱ्या अद्भुत गोष्टी दाखवत असतात , बिटीया खिन्न मनाने वर्गात बसून असते आज जर आपल्याकडे निळ्या डोळ्यांची बाहुली असती तर ती सर्वांना दाखवायला किती मज्जा आली असती असे वाटून ती उदास होते.शाळा सुटल्यावर बिटीया घरी जाते तर तिचे बाबूजी येऊन आराम करत असतात ती पळतच बाबुजीकडे जाते आणि झोपलेल्या बाबूजींच्या कुशीत शिरते तिला प्रेमाने जवळ घेत बाबूजी उठतात मग वेळ न दवडता बिटीया बाबुजीकडे निळ्या डोळ्यांच्या बाहुलीची मागणी करतें.ते ऐकताना बाबूजी उदास होतात मात्र ती उदासी झटकत हा बिटी या निले आँखो वाली गुडिया हमारी बिटीया को जरूर लायेंगे असे ते तिचा प्रेमाने गालगुच्छा घेत म्हणतात.
दुसऱ्या दिवशी आराम न करता बिटीयाचे बाबा सामान घ्यायला खालच्या कॅम्प कडे रवाना होतात ते एका ट्रेकिंग कंपनीत पोर्टर म्हणून काम करत असतात जाताना त्यांच्या डोक्यात एकच असते ते म्हणजे बिटीया साठी निळ्या डोळ्यांची बाहुली घ्यायची ,आज ते प्रमाणापेक्षा जास्त सामान वाहायला एकत्र करत आहेत हे बघून त्यांचे मित्र त्यांना टोकतात मात्र ते त्यांच्याकडे हसून दुर्लक्ष करतात ,
इकडे शाळेत आजचा दिवस क्रीडा स्पर्धांचा असतो बिटीया पळती मध्ये चौथ्या क्रमांकावर येते तिच्या मैत्रिणी आणि ती मैदानावर एका कडेला बसलेले असताना त्यांचं लक्ष मुंग्यांच्या वारुळा कडे जाते आणि मुंग्या आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे उचलून घेऊन निघालेल्या असतात त्यांचे सर्व निरीक्षण करत असतात ,सर्वाधिक मोठा साखरेचा खडा एका मुंगीकडे असतो हे बघून बिटीयाच्या वर्गातील एक मुलगा त्याकडे बोट करत हे बिटीया चे बाबा आहेत असे सांगतो आणि आज ते डोंगरावर कसे जास्तीचे अवजड साहित्य नेताना त्याला दिसले हे ते सांगतो हे ऐकून बिटीया कोणालाच काही न सांगता धावत पळत घरी येते.आणि दारातून आईला मोठ्या मोठ्याने मला नीली आँखो वाली गुडीया नहीं चाहिए असे ओरडत जाते.तिची आई धावत तिच्याकडे येते ,शाळेत घडलेला प्रसंग आईला सांगते आणि बिटीया आईला बिलगुन रडु लागते आणि वारंवार मुझे नहीं चाहिए गुडीया ….एवढे एकच वाक्य म्हणत राहते.रात्री तिचे बाबा तिने सांगितलेली बाहुली घेऊन घरी येतात तेंव्हा बिटीया रडून झोपलेली असते तिची आई बिटीया च्या बाबूजी ना बिटीया का रडून झोपली ते सांगते…तिचे बाबूजी बिटीया जवळ जाऊन हळूच तिच्या कपाळाचा पापा घेतात…..
सकाळी बिटिया उठते तेंव्हा तिचे बाबूजी आधीच कामावर निघून गेलेले असतात तिची आई तिच्या हातात निळ्या डोळ्यांची बाहुली ठेवते तेंव्हा बिटीया तिच्या आईला ती बाहुली पॅक करून परत द्यायला सांगते आणि त्या बदल्यात ती अभ्यासाचे पुस्तक आणि वही आणायला सांगते…तिची आई मेरी बिटीया बडी हो गयी म्हणत तिला प्रेमाने जवळ घेते तेंव्हा बिटीया आपल्या आईला सांगते …मी शाळा शिकून खूप मोठी ऑफिसर बनेन आणि मग …..मेरे बाबूजी अब जादा दिन तक काम नहि करेंगे…और ना ही इतना बोझ ओ उठायेंगे ….हे ऐकून बिटीयाची आई प्रेमाने तिला जवळ घेत ….आमिन…हो हो अगदी असेच होईल असे म्हणून आपल्या डोळ्यातील आनंदाश्रू टिपत राहते.

©राजश्री शिवाजीराव जाधव पाटील

पोर्टर

कथा

नेपाळ

EBC

एव्हरेस्ट

कष्ट

2 thoughts on “पोर्टर”

Leave a Comment